फिल्म क्लब ची सुरुवात

युवांनी आपल्या भोवतालच्या जगाशी नाते जोडावे, या गुंतागुंतीच्या वास्तवातील आपले स्थान ओळखावे आणि त्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी योगदान द्यावे या विचारांनी निर्माण ही युवांच्या शिक्षणाची प्रक्रिया डॉ. राणी व डॉ. अभय बंग यांनी सुरु केली. या प्रक्रियेचे विद्यार्थी आपल्या क्षमतेनुसार, आवडी-निवडी नुसार आपापल्या ठिकाणी कार्य करत आहेत. उत्तम चित्रपट एकत्र बघणे, ते अनुभवणे, त्याबद्दल शेअर करणे, त्यातून जगभरातील विविध वास्तवांची जवळून ओळख करून घेणे, त्यातून आपण अधिक समृद्ध होणे, हा त्यातील एक उपक्रम. गेले आठ महिने आम्ही दर महिन्यातून एकदा एक चित्रपट एकत्र बघत आहोत.

एकत्र चित्रपट बघण्याची अलग मजा

आपण आपल्या संकल्पनांना इतके घट्ट धरून असतो की त्यापेक्षा काही वेगळे समजायलाबघायलाअन् स्वीकारायला आपली तयारी नसते. जो वेगळा विचार आहे तो शांत पणे आत्मसात करण्याचीमोकळेपणाने समजून घेण्याची आपल्या मनाची अवस्था नसते. 

चित्रपटामध्ये आपल्या मनाची अशी अवस्था निर्माण करण्याची ताकद आहे जी आपल्या घट्ट समजुतींना काही वेळ बाजूला ठेवू देते. त्यांना तपासायला लावतेत्यातील त्रुटी सापडल्यास त्या सुधारायला उद्युक्त करते.  आणि त्यातून आपली समज अधिक विवेकी बनू शकते. 

एकत्र चित्रपट बघण्याची अलग मजा आहे. चित्रपटानंतर जेव्हा गप्पा होतात तेव्हा त्याच कलाकृती कडे किती निरनिराळ्या तऱ्हेने प्रत्येक जण बघत असते हे समजते. प्रत्येक जण आपापल्या जीवन अनुभवाशी त्याची सांगड घालू पाहतो आणि त्यातून हा प्रवास अजूनच समृद्ध होतो. 

एकत्र प्रवासातील आठवणी जशा आपल्याला एकत्र बांधून ठेवतात. त्यातील घटनामजाविनोदजसे त्या सहप्रवाशांनी एकत्र अनुभवले असतात अन् नंतर कधीतरी जेव्हा त्याचा संदर्भ द्यावा लागतो तो या सहप्रवाशांना अगदी सहज समजतो. तसेच चित्रपटांचेही आहे. एकत्र बघितलेल्या चित्रपटातील घटनेचा संदर्भ आपल्या सहप्रवाशाला लगेच लागतो. शब्दात करता येणार नाही तो संवाद केवळ या संदर्भामुळे होऊन जातो. 

आतापर्यंतच्या प्रवासातील स्टेशने...

या प्रवासाची सुरुवात आम्ही ‘लाईफ इज ब्युटिफुल’ इथून केली. दुसऱ्या महायुद्धातील हिंसेच्या काळात, छळछावणीतील भीषण अत्याचाराला सामोरे जाताना त्याची झळ आपल्या लहान मुलाला लागू नये यासाठी विनोदाची विलक्षण ताकद वापरून एका बापानी दिलेला हा ‘जीवन सुंदर आहे’ हा संदेश याची ही कथा. मग आमचे जहाज लागले ‘कॅसब्लँका’ या मोरोक्को देशातील बंदराला. पुढील स्टेशन अमेरिकेतील मॅडिसन कौंटीतील एक छोटेसे गाव. ‘द ब्रिजेस ऑफ मॅडिसन कौंटी’ ही फ्रॅन्सेस्का आणि रॉबर्ट यांच्या चार दिवसाच्या एकत्र सहवासाची कथा. या चार दिवसांचा सहवास हा फ्रॅन्सेस्काच्या आयुष्यातील पोकळी काढून टाकतो अन् तिच्या  उर्वरित आयुष्यासाठी कायमची ठेव होतो. हा प्रवास असाच पुढे इराण मध्ये ‘ऑफसाईड’ निमित्त पोहोचला. इराण मधील तरुणींनी स्वातंत्र्यासाठी केलेला संघर्ष जाफर पनाही या दिग्दर्शकानी फार साधेपानानी मांडला आहे. या प्रवासातील ही काही ठळक स्टेशने.

ही प्रक्रिया आम्हा सर्वांना अत्यंत समृद्ध करणारी वाटली आणि म्हणून या प्रवासात अधिकाधिक मित्रांना सहभागी होता यावे यासाठी एका मोठ्या सभागृहाचा शोध घेतला आणि नॅशनल फिल्म अर्काईव्ह ऑफ इंडिया (NFAI) ही जागा निश्चित झाली.

पुढील चित्रपट ‘अप’ हा आहे. हा पिक्सार चा ऍनिमेटेड चित्रपट आहे. एका आजोबा आणि लहान मुलाची ही मज्जेदार कथा आहे. आपल्या उडत्या घरातून आपली स्वप्न पूर्ण करण्याचा त्यांचा ध्यास यात बघायला मिळतो. या प्रवासात सहभागी होण्यासाठी आपल्या सर्वांना आग्रहाचे निमंत्रण. 

ठिकाण:

आर्काईव्ह (NFAI),

प्रभात रस्त्याचे चे लॉ कॉलेज रस्त्याचे टोक

पुणे

 

दिनांक:

१९ एप्रिल २०१२

गुरुवार

सायं: ६ ते ९

 

अधिक माहितीसाठी: संपर्क दीपा देशमुख ९४५५ ५५५४०, तन्मय जोशी ८०८७५ ०२१८६